पुणे हादरलं..खडकवासला धरणात तरुण तरुणीचा मृतदेह अन एक वही..

Spread the love

पुण्यात एक खळबळजनक अशी घटना उघडकीला आली असून खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून एका तरुण तरुणीचा मृत्यू झालेला आहे. सोनापूर गावाच्या हद्दीत ही घटना घडलेली असून हवेली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत मात्र मृतदेहांची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही.

एका स्थानिक नागरिकाला रस्त्याच्या कडेला एक दुचाकी दिसून आली होती मात्र दुचाकीजवळ कोणीही नसल्याने नागरिकाने धरणाच्या पाण्याकडे जाऊन पाहणी केली त्यावेळी त्या पाण्यात दोन मृतदेह तरंगताना दिसून आले. त्यानंतर हवेली पोलिसांना याप्रकरणी खबर देण्यात आल्यावर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढला आणि पंचनामा केला आहे. स्थानिक व्यक्ती हा खाद्यपदार्थाची टपरी चालवणारा व्यक्ती असून शनिवारी आणि रविवारी त्या ठिकाणी आपला व्यवसाय करतो.

गाडीच्या नंबरवरून दोघांपैकी एक जण सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे मात्र अद्यापपर्यंत खात्रीलायक अशी माहिती पोलिसांच्या देखील हाती आली नाही. मयत तरुणीच्या बॅगमध्ये असलेल्या एका वहीवर प्रियंका चौगुले असे लिहिलेले आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आधी देखील अशा स्वरूपाच्या घटना घडलेल्या असून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक पर्यटक तसेच तरुण-तरुणी गंमत म्हणून फिरायला येतात मात्र तिथे आल्यानंतर पाण्यात उतरण्याचा मोह त्यांना आवरत नाही आणि एकदा पाण्यात उतरल्यावर पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यातून असे दुर्दैवी प्रकार पूर्वीही घडलेले आहे. पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन यांनी असे प्रकार होऊ नये यासाठी अधिक सक्रियतेने काम करण्याची गरज आहे.


Spread the love