देशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून बलात्कारानंतर जन्म झालेल्या अपत्याचा त्याच्या अल्पवयीन आईने अमानुषपणे खून केल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे . मध्य प्रदेशातील दमोह येथील तेंदुखेडा इथे ही घटना घडलेली असून बाळाच्या आईचे वय हे १५ वर्षे असल्याचे समजते . बाळाची आई ही अल्पवयीन असून एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्यावर ती गर्भवती राहिली होती.
धक्कादायक बाब म्हणजे मुलाची दोरीने गळा आवळून हत्या केल्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून आईने त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र संशय आल्याने त्याचे पोस्टमार्टेम करण्यात आले त्यावेळी त्याचा मृत्यू हा गळा आवळून झाला असल्याचे समोर आले. पोलिसांनी आईची कसून चौकशी केली असता आईनं मुलाच्या हत्येची कबुली दिली.
उपलब्ध माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर 17 वर्षीय तरुणाने वेळोवेळी बलात्कार केला अन त्यातून ती गर्भवती राहिली होती.काही वर्षांपूर्वी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते मात्र त्यानंतर त्याच्यात शारीरिक संबंध देखील प्रस्थापित झाले आणि त्यातून मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. नातेवाईकांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे .
तेंदुखेडा एसडीओपी अशोक चौरसिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2021 रोजी एका 15 वर्षांच्या मुलीवर एका किशोरवयीन मुलानं बलात्कार केला होता. ऑगस्टमध्ये मुलगी गरोदर असल्याचं तिच्या कुटुंबीयांना समजलं. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीला अटक करून बालसुधारगृहात पाठवण्यात आले आणि त्यानंतर 16 ऑक्टोबर रोजी जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन मुलीनं एका मुलाला जन्म दिला.
मुलीचं वय कमी असल्यानं मुलाला जन्म दिल्यानंतर तिची प्रकृती ठीक नव्हती त्यामुळे बाळ आणि आई 22 दिवस रुग्णालयात होते. बरी झाल्यानंतर मुलगी तिच्या गावी गेली.10 नोव्हेंबरच्या रात्री अल्पवयीन आई आपल्या बाळाला घेऊन तेंदुखेडा रुग्णालयात पोहोचली. मुलाची तपासणी केली असता बालकाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले. पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी बाळाचे पोस्टमॉर्टम केले असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला.