तब्बल ३२ वर्षांनी भाजपाला ‘ अस्मान ‘ दिसलं तर चिंचवडमध्ये भाजप विजयी

पुण्यात आजचा निवडणूक निकालाचा असून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले असून भाजपवर आत्मपरीक्षणाची वेळी आलेली आहे तर चिंचवड इथे भाजप उमेदवार अश्विनी जगताप विजयी झाल्या असून नाना काटे आणि राहुल कलाटे यांची एकत्रित मते मात्र अश्विनी जगताप यांच्यापेक्षा जास्त असल्याने बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसल्याचे दिसून येत आहे .

कसबा इथं पोस्टल मतदानापासूनच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. मतमोजणीपासून धंगेकर यांनी आता 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. भाजपने कसबा पोटनिवडणुकीमध्ये सर्व ताकदपणाला लावली होती. मनसे, शिवसेना शिंदे गटाने सुद्धा भाजपला पाठिंबा दिला होता पण पुणेकरांनी भाजपला धक्का देत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना प्रचंड मतांनी निवडून दिलं आहे.

पुण्यातील पेठेतली नाराजी भाजपला चांगलीच महागात पडलेली असून गिरीश बापट यांनीही नाराजी दाखवली होती. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला आहे. धंगेकर यांच्या बाजूने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार प्रचार केला होता. आदित्य ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनीही प्रचार केला होता. महाविकास आघाडीने एकीचे बळ दाखवून पूर्ण ताकदीने प्रचार केला अन अखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी बोलताना , ‘ निकाल समोर येण्याअगोदर काही बोलण चुकीचे आहे म्हणून बोललो नव्हतो. माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी झाली आहे. आम्ही कसब्यात योग्य उमेदवारी दिली. रविंद्र धंगेकर योग्य उमेदवार ठरला. धंगेकर हे तळागाळात काम करणारा नेता आहे. त्याने महापालिकेतही उत्तम काम केले आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत एकजुटीने काम केले यामुळे हा विजय झाला , असे म्हटलेले आहे .