पुण्यात ‘ भाईगिरी ‘ आली अंगलट , चिखली इथे आलेले असतानाच..

पुणे जिल्ह्यात भाईगिरी चांगलीच चर्चेत आलेली असून आत्तापर्यंत मोठ्या व्यक्तींकडून खंडणी उकळणाऱ्या भाईंनी आता परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना देखील वेठीस धरल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पिंपरी परिसरात फळ विक्रेत्याकडून हजारो रुपयांची खंडणी घेणाऱ्या तीन जणांना खंडणी विरोधी पथकाने 14 तारखेला चिखली इथे ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बाळू उर्फ जयंत नारायण गारोळे ( वय 46 राहणार चिखली ), संदीप बाबुराव बाबर ( वय 28 राहणार चिखली ) आणि भारत नवनाथ सोनवणे ( वय 22 राहणार चिखली ) अशी आरोपींची नावे असून त्यातील बाळू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल आहेत याआधी त्याच्या विरोधात मोका कायद्याअंतर्गत देखील कारवाई करण्यात आलेली होती.

फळविक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडून आरोपी हे रोज खंडणी घेत होते. एके दिवशी त्यांनी यास नकार दिला म्हणून त्यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्या गल्ल्यातून जबरदस्तीने दोनशे रुपये काढून घेतले. फिर्यादी यांनी यानंतर पोलिसात तक्रार दिली आणि खंडणी विरोधी पथकाने त्यांना चिखली भाजी मंडई येथून ताब्यात घेतलेले आहे. आरोपींनी आतापर्यंत 21 हजार रुपये उकळल्याचे देखील फिर्यादी यांचे म्हणणे आहे. सदर कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधावणे , अमर राऊत रमेश गायकवाड यांच्या पथकाने केलेली आहे.