महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार हिंगोली जिल्ह्यात समोर आलेला असून लग्नाला नकार दिल्याने तृतीयपंथी असलेल्या एका व्यक्तीने एका तरुणाचा गळा आवळून त्याचा खून केलेला आहे. हिंगोली येथील या घटनेत सुरुवातीला आत्महत्येचा बनाव रचण्यात आलेला होता मात्र पोलिसांनी प्रकरणाची पाळेमुळे खणून काढत दोन जणांना ताब्यात घेतलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अशोक आठवले असे मयत व्यक्तीचे नाव असून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे असा बनाव आरोपींकडून रचण्यात आलेला होता त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात देखील घेऊन जाण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. गुन्हेगार असलेली किन्नर प्रिया उर्फ दीपक नरसिंग तुरमालू आणि शेख जावेद अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
हिंगोलीतील नवलगव्हाण येथील अशोक आठवले नावाचा तरुण आणि किन्नर म्हणून कार्यरत असलेली प्रिया उर्फ दीपक नरसिंग तुरमालू यांची मैत्री झालेली होती. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि त्यानंतर किन्नर असलेली प्रिया ही त्याला लग्नासाठी तगादा सुरू करू लागली. 30 मार्च रोजी किन्नर प्रिया हिला मी तुझ्यासोबत लग्न करत नाही असे सांगत अशोक याने नकार दिला होता त्यानंतर तिने तिचा मित्र शेख जावेद शेख ताहीर कुरेशी याच्या मदतीने अशोक याचा गळा आवळला.
गळा दाबल्यानंतर त्याचा मृत्यू होईल याची आरोपींना कल्पना नव्हती मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येतात दोघांनीही त्याला हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे गळफास घेऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असे सांगितलेले होते मात्र डॉक्टरांनी अशोक याला मृत घोषित केले. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली त्यावेळी सर्वप्रथम किन्नर प्रिया आणि तिचा साथीदार शेख जावेद यांची कसून चौकशी केली त्यावेळी त्यांच्या बोलण्यात संभ्रम आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवला त्यावेळी त्यांनी अशोक याची हत्या केल्याची कबुली दिलेली आहे .