‘ स्टिंग ‘ सोबत इतर एनर्जी ड्रिंकवर बंदी , ग्रामपंचायतीने काढले आदेश

सध्या सेलिब्रिटी आणि नामांकित व्यक्तींनी जाहिरात केल्यानंतर एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली जास्त प्रमाणात कॅफिन असणारी थंड पेय सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत त्यावर पिण्यासाठी दिलेले निकष लहान मुले तसेच तरुण वाचत नसल्याने त्यांच्या जीविताला अपाय होण्याची शक्यता आहे . या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील एका ग्रामपंचायतीचा निर्णय चांगलाच चर्चेत आलेला असून ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीमध्ये सर्व दुकानदार बांधवांना स्टिंग, फ्रेश एनजी आणि चार्ज ‘ तसेच इतर कॅफेन असणारी थंडपेय विकण्यास बंदी घातलेली आहे. या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक देखील देण्यात आलेले आहे.

प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे की ?

नवे पारगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरमार्फत गावातील सर्व दुकानदार बंधूंना कळविण्यात येते की दुकानांमध्ये विक्रीसाठी असणाऱ्या थंड पेयामध्ये अनेक थंडपेय आहेत. जसे की ‘ स्टिंग, फ्रेश एनजी चार्ज ‘ वगैरे प्रकारच्या अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत. गावांमध्ये अठरा वर्षाखालील लहान मुलांच्यामध्ये अशाप्रकारे थंड पेय पिण्याचे प्रमाण वाढलेले आढळून आलेले असून कॅफेनयुक्त थंड पेयापासून लहान मुलांच्या आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करून अशा थंडपेयापासून लहान मुलांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका आणि तरुणांच्या वाढत्या व्यसनाधीनता या गोष्टींना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामसभेच्या ऐन वेळेच्या विषयांमध्ये अशा थंडपेयांच्या विक्रीवर बंदीचा ठराव करण्यात आलेला असून अशा प्रकारच्या थंड पेयाची विक्री आपल्या दुकानांमध्ये करू नये तसेच या प्रकारच्या थंड पेयांची जाहिरात देखील आपल्या दुकानाच्या समोर करू नये. असे प्रकार आढळून आल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.