पुणे महापालिकेने एक पुरोगामी पाऊल उचलले असून महापालिकेचा हा निर्णय वादात सापडण्याची शक्यता आहे. समाजातील सर्व वर्गातील नागरिकांना समान वागणूक मिळावी या उद्देशाने तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मनपाच्या मिळकतीचे संरक्षणार्थ प्रायोगिक तत्त्वावर 25 तृतीयपंथीय व्यक्तींची नेमणूक केली जाणार आहे. महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विक्रमकुमार यांनी यासंदर्भात मान्यता दिलेली आहे.
पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल , राजीव गांधी प्राणी संग्रहालय , मनपा भवन तसेच अनधिकृत बांधकाम निर्मूलन आणि अतिक्रमण विभागाच्या कारवाईसाठी तृतीयपंथीय व्यक्तींची नेमणूक करण्यात येणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या सैनिक सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड व इतर एका कंपनीकडून कडूनच ही नेमणूक केली जाणार असली तरी अनधिकृत बांधकाम निर्मूलन आणि अतिक्रमण विभागाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे वाद होण्याची शक्यता आहे .
पुणे शहरातील तृतीयपंथी वर्गासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांची कमिटी तयार करून कर्मचारी अधिकारी आणि तृतीयपंथी कामगार यांच्यात सलोख्याचे आणि सामाजिक स्नेहाचे वातावरण राहावे यासाठी जनजागृती अभियान राबवले जाणार आहे. 17 तारखेपासून तृतीयपंथी व्यक्ती हे अतिक्रमण कारवाईत देखील सहभागी होणार असल्याने हा चर्चेचा विषय झालेला आहे . अतिक्रमण विभागाचे अधिकारी कारवाईसाठी गेल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याचे देखील प्रकरण समोर आलेले होते या पार्श्वभूमीवर हा निर्णय चर्चेचा ठरलेला आहे.