ट्रिपल तलाक देण्याला बंदी असताना देखील पत्नी आणि मुलीची जबाबदारी न घेता पत्नीला तोंडी तिहेरी तलाक देऊन पळून जाणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पुण्यात न्यायालयाने दिलेले आहेत. कॅन्टोन्मेंट न्यायालयाचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जे डी पाटील यांनी याप्रकरणी आदेश दिलेले असून कौटुंबिक हिंसाचार , अत्याचार ,मारहाण धमकावणे तसेच मुस्लिम महिला कायद्यान्वये आरोपी पतिवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, एका विवाहित महिलेने तिचा पती अकीब आयुब मुल्ला ( वय 32 राहणार कोंढवा ) आणि सासरच्या व्यक्तींच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. डिसेंबर 2016 मध्ये त्यांचे लग्न झालेले होते. लग्न होण्यापूर्वी सासरच्या व्यक्तींनी स्थावर मालमत्तेबद्दल जी काही माहिती दिलेली होती ती सत्य परिस्थितीत कुठेच आढळून आली नाही त्यामुळे तक्रारदार महिला यांचा देखील खर्च देखील तिचे आई-वडील करत होते.
काही वर्षांपासून माहेराहून पैसे घेऊन ये असे म्हणत सातत्याने तिला त्रास सुरू झाला त्यासाठी तिला मारहाण शिवीगाळ आणि प्रसंगी उपाशी देखील ठेवण्यात आले. तिच्यावर नोकरी करण्यासाठी दबाव टाकला जात होता. सासरच्या व्यक्तींनी तिला तलाक देण्यासाठी प्रवृत्त केले आणि अखेर तिचा पती तोंडी तलाक देऊन पसार झाला त्यामुळे तिने न्यायालयात दाद मागितली त्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असून महिलेचा पती , त्याचे आई-वडील बहीण आणि मेहुना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर आरोपी अकीब याला अटक करण्यात आलेली आहे