पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून अवघ्या चार दिवसांपूर्वी पिंपरीत जाऊन मुलींच्या नावाने आरडाओरडा करत दहशत पसरवण्याचा प्रकार करण्यात आलेला होता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपींना विक्रमी वेळेत ताब्यात घेतले आणि त्यानंतर परिसरातच त्यांची धिंड काढण्यात आलेली आहे. तळेगाव दाभाडे येथे 27 तारखेला ही कारवाई करण्यात आलेली आहे. कीटक गैंगवर ही कारवाई करण्यात आल्यानंतर नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कीटक उर्फ जय प्रवीण भालेराव ( वय 19 ), वैभव राजाराम विटे ( वय 25 ), विशाल शिवाजी गुंजाळ ( वय 20 ) आणि प्रदीप वाघमारे , ऋतिक मेटकरी ( वय 20) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्यासोबत एका विधी संघर्षित बालकाला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे. एका महिलेने त्यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिसात तक्रार दिलेली होती.
मुख्य आरोपी असलेला कीटक याने त्याच्या साथीदारासह तळेगाव दाभाडे येथे भरदिवसा मुलींची नावे घेत गल्लीमध्ये आरडाओरडा केलेला होता. फिर्यादी महिला त्याला समजावण्यासाठी आलेल्या असताना त्याने त्यांचा विनयभंग केला सोबतच महिलेच्या दिराला कोयत्याचा धाक दाखवत त्याच्या खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. लोकांना धमकावून त्याने परिसरात दहशत निर्माण केली त्यानंतर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने त्यांना अटक केली होती त्यानंतर त्यांची परिसरात धिंड काढण्यात आलेली आहे.