गेल्या काही वर्षांपासून कायदा हातात घेण्याचे प्रमाण नागरिकांमध्ये वाढलेले पाहायला मिळत असून अशीच एक घटना पुण्यात समोर आलेली आहे . हेल्मेट न घालता रस्त्यावरून जात असताना एका दुचाकीचालकाला पोलिसांनी थांबवले आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात त्याला बोलावलेले होते. पोलिसांसमोर हुज्जत सुरू असताना त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या कानाखाली वाजवलेली आहे. 28 मे रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास बिबवेवाडी पोलीस ठाण्यात हा प्रकार घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , गौरव हरीश वालावकर ( वय 29 राहणार चिंतामणी रेसिडेन्सी बिबवेवाडी ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात सहाय्यक फौजदार रामदास बांदल यांनी बिबबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
28 मे रोजी रात्री नाकाबंदी लावण्यात आलेली होती यावेळी फिर्यादी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बर्डे व इतर काही कर्मचारी नाकाबंदी करत असताना गौरव तेथून दुचाकीवर विनाहेल्मेट चाललेला होता. त्याला अडवून पोलिसांनी गाडीचे आरसी बुक आणि लायसन्स दाखवण्यास सांगितले त्यावेळी त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
पोलीस त्याला कागदपत्रांची मागणी करत होते त्यामुळे तो संतापलेला होता त्यानंतर त्याने त्याची मैत्रीण सुचिता घुले हिला बोलावून घेतले अखेर पोलीस ठाण्यात गौरव याला आणण्यात आले त्यावेळी वादावादी सुरू असताना त्याने अचानकपणे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली वाजवली आणि आता काय करायचे ते करून घ्या असे देखील तो म्हणाला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.