शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार धायरीत समोर आलेला असून चक्क दहशत पसरवण्याच्या उद्देशाने सोबतच एक वर्षांपूर्वी झालेल्या भावाच्या हत्येचा बदला म्हणून विनाकारण एका व्यक्तीचा खून करण्याचा प्रकार पुण्यात समोर आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, राहुल चंद्रकांत आटोळे ( वय 36 राहणार गोसावी वस्ती नांदेड गाव ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. राहुल आटोळे हा पेरू विक्रेता म्हणून काम करत होता त्यावेळी अज्ञात मारेकर्यांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले असे रविवारी समोर आलेले होते. राहुल याचे कुणासोबत कधी भांडणही झालेले नव्हते आणि कुठल्याही गुन्ह्यात तो सहभागी नव्हता त्यामुळे त्याची हत्या का करण्यात आली याचा शोध घेणे पोलिसांपुढे देखील आव्हानात्मक बनलेले होते.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली त्यावेळी नांदेड फाट्याजवळ एक वर्षांपूर्वी एका भंगाराच्या दुकानात सराईत गुन्हेगार असलेला मारुती ढेबे ( वय 20 ) याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलेली होती त्यावेळी नांदेड फाट्याजवळील गोसावी वस्ती येथील काही आरोपी यात सहभागी होते असा आरोपींचा अंदाज होता . या हत्येचा बदला म्हणून गोसावी वस्ती येथील एका तरी व्यक्तीला संपवायचे या उद्देशाने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. राहुल आटोळे याचा ढेबे याच्या हत्येसोबत आत्तापर्यंत कुठलाही संबंध आढळून आलेला नाही.
गोसावी वस्तीत केवळ राहतो म्हणून त्याचा खून केल्याची माहिती समोर आल्यानंतर पुण्यातील वातावरण किती खराब झालेले आहे हे समोर आलेले असून हवेली पोलिसांनी तात्काळ तपास करून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलेले असून त्यांचा एक साथीदार फरार आहे . सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.