शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात एक खळबळजनक असे प्रकरण आलेले आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने शिक्षिका असलेल्या स्वतःच्या पत्नीची आणि मुलांची हत्या करून त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केलेली आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथील ही घटना आहे.
उपलब्ध माहितीनुसार, डॉक्टर अतुल शिवाजी दिवेकर ( वय 42 वर्ष ) असे पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या व्यक्तीचे नाव असून ते त्यांची पत्नी पल्लवी दिवेकर ( वय 39 वर्ष ) हिच्यासोबत वरवंड इथे राहत होते. त्यांना दोन मुले असून अद्वैत ( वय नऊ वर्ष ) आणि मुलगी अवंतिका ( वय सहा वर्ष ) अशी त्यांची नावे आहेत. डॉक्टरांनी पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर मुलांना विहिरीत फेकून दिले आणि स्वतः देखील आत्महत्या केली. पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले अतुल दिवेकर यांची पत्नी शिक्षिका असून पत्नीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे .दोघांमध्ये सातत्याने वाद होत असायचे मात्र दोघेही उच्चशिक्षित होते त्यामुळे असा काही प्रकार होईल असा कुणालाही अंदाज नव्हता.
डॉक्टर अतुल दिवेकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिलेली असून त्यामध्ये , ‘ मी माझ्या बायकोच्या त्रासाला वैतागून तिला मारून टाकलेले आहे . मी माझा एक मुलगा आणि मुलगी यांना गणेशवाडी तालुका दौंड येथील जगताप विहिरीमध्ये मारून टाकलेले आहे आणि मी स्वतः देखील आयुष्य संपवत आहे ,’ असे त्यांनी लिहिलेले आहे. डॉक्टरांनी पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर मुलांना विहिरीत टाकून त्यांची ही हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली असे समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.