पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळक्याकडे चौकशीसाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या डोळ्यात चक्क मिरची स्प्रे मारल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सव्वीस तारखेला रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी इथे ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अमोल रमेश ढेरे असे जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून याप्रकरणी निहाल हरपाल सिंग (वय ३५) , आणि मंगेश लक्ष्मण गायकवाड ( दोघेही राहणार मुंबई ) यांना पोलिसांनी अटक केलेली आहे . त्यांच्यासोबत संजय पडवळ नावाच्या एका व्यक्तीच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक असलेले डेरे हे त्यांच्या स्टाफसोबत मेदनकरवाडी इथे गस्त घालत होते त्यावेळी त्यांना तिथे तीन आरोपी संशयितपणे थांबल्याचे दिसले. त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यातील एकाने डेरे यांच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारला त्यामध्ये ते किरकोळ जखमी झालेले असून सोबतच्या पथकाने त्यानंतर तात्काळ आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे प्लास्टिक बनावट पिस्तूल , मिरची स्प्रे , स्क्रू ड्रायव्हर आदी साहित्य आढळून आलेले असून चाकण पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.