पुणे जिल्ह्यात गाजलेल्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचार प्रकरणात सुमारे 44 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून हडपसर पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना अखेर अटक केलेली आहे.सदर प्रकरणी सहा महिन्यांपूर्वीच गुन्हा दाखल झालेला होता आणि गेल्या काही महिन्यांपासून दराडे यांची चौकशी देखील सुरू होती.
शैलजा दराडे यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे याला देखील अटक करण्यात आलेली असून आरोपी बहीण भावाच्या विरोधात संगणमत करून फसवणूक आणि अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी याप्रकरणी फिर्याद दिलेली आहे. दादासाहेब दराडे आणि शैलजा दराडे सध्या चौकशीच्या भोवऱ्यात असून अशाच पद्धतीने त्यांनी अनेक जणांची फसवणूक केल्याचा देखील आरोप तक्रारदार व्यक्ती यांनी केलेला आहे.
पोपट सुखदेव सूर्यवंशी हे शिक्षक असून त्यांच्या नात्यातील एका महिलेला शिक्षकाची नोकरी पाहिजे म्हणून त्यांनी जून 2019 मध्ये दादासाहेब दराडे यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी नोकरीचे आमिष दाखवत सत्तावीस लाख रुपये घेतले मात्र नोकरी दिली नाही . सूर्यवंशी यांनी दराडे यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली मात्र दराडे यांनी पैसे देखील परत केले नाही म्हणून सूर्यवंशी यांनी हडपसर पोलिसात तक्रार दाखल केलेली होती.