पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यानंतर त्यांच्या शारीरिक शोषणाच्या घटना रोज समोर असून अशीच एक आणखीन घटना शिरूर तालुक्यातील सणसवाडी इथे समोर आलेली आहे. एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार करून या घटनेचा व्हिडिओ बनवत आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल करून दिला. शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणाच्या विरोधात याप्रकरणी बलात्कार आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अभिजीत बालाजी घनसावंत असे याप्रकरणी आरोपी व्यक्तीचे नाव असून सणसवाडी इथे पीडित अल्पवयीन मुलीची ओळख अभिजीत याच्यासोबत झालेली होती. मुलीची आई घरी नसताना आरोपी अभिजीत याने तिच्यावर दमदाटी करत अत्याचार केला आणि त्यानंतर या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बनवला. आरोपीने त्यानंतर जर कुणाला काही सांगशील तर परिणाम चांगले होणार नाहीत याची देखील धमकी दिली.
काही दिवस उलटल्यानंतर आरोपीने हा व्हिडिओ चक्क काही लोकांना पाठवला त्यानंतर हा प्रकार सार्वजनिक झाला आणि अखेर युवतीच्या नातेवाईकांनी तिला विचारले त्यावेळी तिने झालेला प्रकार सांगितला. अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अखेर अभिजीत घनसावंत ( राहणार सणसवाडी तालुका शिरूर ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर पुढील तपास करत असल्याची माहिती आहे .