सध्या गणेशोत्सव सुरू असल्याकारणाने पोलीस दलावर प्रचंड तणाव आहे . ठिकठिकाणी बंदोबस्त असल्याकारणाने अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमासाठी जाणेदेखील बहुतांश पोलिसांना शक्य होत नाही अशावेळी अनेकजण आजारी असल्याचे कारण देऊन सुट्टी मिळतात मात्र खोटे बोलून सुट्टी मिळवणे एका पोलीस निरीक्षकाला चांगलेच महागात पडलेले आहे. सदर पोलीस निरीक्षक यांचे अखेर निलंबन करण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मुंबईतील ही घटना असून राखीव पोलीस निरीक्षक असलेले संजय सावंत यांनी आजारपणाचे कारण देत गणपतीला कणकवली इथे जाण्यासाठी सुट्टी मागितली होती मात्र सुट्टी मिळत नसल्याकारणाने त्यांनी आजारी असल्याचा बहाना केला. लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी ही कारवाई केलेली आहे. घाटकोपर मुख्यालयात संजय सावंत हे नोकरीला होते.
सद्य परिस्थितीत संवेदनशील परिस्थिती असल्याकारणाने आणि बंदोबस्त असल्याने साप्ताहिक सुट्या वगळता इतर सर्व रजा बंद करण्यात आलेल्या आहेत. पोलीस दलावर मोठ्या प्रमाणात दबाव आहे असे असताना 14 तारखेला राखीव पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी आजारी असल्याचे कारण देत सुट्टी घेतली होती. ते खरोखर आजारी आहेत का ? याची खात्री करण्यासाठी ठाकुरली येथील त्यांच्या घरी एका पोलीस कर्मचाऱ्याला पाठवण्यात आले त्यावेळी घराला कुलूप होते आणि संजय सावंत हे गावी गेलेले होते हे लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे .