देशासाठी कुंकू देणाऱ्या वीरपत्नीला देखील न्याय मिळेना , सरकारी कार्यालयात गेलं की..

Spread the love

सीमेवर सैन्याचे रक्षण करणारा सैनिक अनेक महिने कुटुंबापासून दूर राहतो . ऊन वारा पाऊस कसलीही पर्वा न करता देशाच्या सीमेवर अहोरात्र काम करणाऱ्या सैनिकाला अनेकदा वीरमरण देखील येते आणि कुटुंबावर मोठे संकट कोसळते अशा परिस्थितीत तरी शासकीय यंत्रणा आणि सरकारी अधिकारी यांनी संवेदनशीलता दाखवत दाखवायला हवी मात्र सरकारी बाबू इतके सोकावले आहेत की अनेकदा सीमेवर सैनिक शहीद झाल्यानंतर देखील वीरपत्नीला देखील न्याय मिळत नाही असाच एक प्रकार सध्या साताऱ्यात समोर आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , साताऱ्यातील दुष्काळी भाग म्हणून असलेल्या मान तालुक्यातील जाशी गावचे सुपुत्र चंद्रकांत गलांडे हे सात वर्षांपूर्वी भारतीय सेनेमध्ये कार्यरत असताना शहीद झालेले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी निशा गलांडे यांना रानंद इथे शासकीय जमीन मिळालेली आहे मात्र या जमिनीची कब्जेपट्टीप्रमाणे विभक्त सातबारा करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून दहिवडी येथील भूमी अभिलेख कार्यालयात त्या हेलपाटे मारत आहेत मात्र अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. सातारा येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे.

निशा गलांडे म्हणाल्या की , ‘ शहीद जवानाच्या पत्नीला प्रशासन आणि शासकीय अधिकारी देखील अजिबात सहकार्य करत नाहीत. मुलांच्या शिक्षणासाठी मी सध्या पुण्यात राहते. दहिवडी येथील शासकीय तहसीलदार कार्यालय , प्रांत कार्यालय आणि अभिलेख कार्यालय यामध्ये मी गेल्या दोन वर्षांपासून हेलपाटे मारत आहे मात्र अद्यापही न्याय मिळत नाही. भूमी अभिलेख कार्यालय दहिवडी इथे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने गैरहजर असतात. लोकप्रतिनिधी देखील शासकीय कामात सहकार्य करत नाहीत. माजी सैनिक आणि भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेल्या लोकांच्या शहीद झालेल्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदनाहीन झालेला समाज पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येते , ‘ असे त्यांनी म्हटलेले आहे.

जाशी गावालगत असलेल्या शेतात चंद्रकांत गलांडे यांची स्वतंत्र वस्ती असून त्यांचे वडील आई पत्नी आणि मुले असा त्यांचा परिवार आहे . 2004 मध्ये चंद्रकांत हे लष्करात भरती झालेले होते. आसाम आणि जम्मू काश्मीर येथे त्यांनी सेवा बजावली मात्र काश्मीर खोऱ्यात लान्स नायक म्हणून काम करताना त्यांना 30 सप्टेंबर 2017 रोजी वीरमरण आले त्यानंतर अद्यापपर्यंत सरकार दरबारी आपली केवळ उपेक्षाच झालेली आहे , असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे.


Spread the love