महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी इथे समोर आलेला असून एका कुर्डूवाडी नगरपालिकेच्या एका ठेकेदाराचे खंडणीकरता अपहरण करण्यात आलेले होते. ठेकेदाराच्या पत्नीने सतर्कता दाखवत पोलिसांना खबर दिली आणि त्यानंतर ठेकेदाराची सुखरूप सुटका करण्यात आलेली असून चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , लक्ष्मण पाटील ( म्हैसगाव तालुका माढा ), आदित्य हुरडे ( बार्शी ) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात ठेकेदार गोरख मच्छिंद्र नरोटे ( केमवाडी तालुका तुळजापूर ) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केलेली आहे. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी एक ते रात्री दहाच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे.
नगर परिषदेकडे बिल अडकलेले असल्याकारणाने ठेकेदार देखील आर्थिक अडचणीत होते मात्र आरोपी त्यांच्याकडे सातत्याने पैशाची मागणी करत होते. मागील पंधरा दिवसापूर्वीच त्यांनी फिर्यादी आणि त्यांची पत्नी यांना शिवीगाळ आणि दमदाटी देखील केलेली होती. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता आरोपी लक्ष्मण पाटील आणि त्याचा मित्र आदित्य हुरडे यांच्यासोबत इतर दोन जणांना घेऊन आरोपी नगरपालिका कार्यालयात आले.
आरोपी आणि फिर्यादी यांची तिथे भेट झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना बायपास रोडवरील हॉटेलवर येण्याचे सांगितले आणि त्यानंतर फिर्यादी यांना भेटण्यासाठी आलेल्या मित्राच्या स्कॉर्पिओ गाडीत रात्री साडेनऊच्या दरम्यान नेण्यात आले . फिर्यादीने गाडीतून आपल्या पत्नीला फोन करून आपले अपहरण झाल्याची माहिती दिली त्यानंतर पत्नीने सतर्कता दाखवत पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी तात्काळ मुख्य आरोपी लक्ष्मण पाटील याला अटक केलेली आहे.