पुण्यामध्ये गेल्यावर्षी मॉडेल कॉलनी परिसरात एका तरुण कामगाराचा खून झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अखेर हा प्रकार पगाराच्या वादातून झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे .कंपनीच्या मालकाने त्याचा खून केल्याचे समोर आलेले असून कंपनीचा मालक आणि राजकीय पदाधिकाऱ्यासोबत तब्बल 13 जणांच्या विरोधात शुक्रवारी तीन तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अविनाश भिडे ( वय 36 वर्ष राहणार बेनकर वस्ती धायरी सिंहगड रस्ता ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून त्यांची पत्नी रेखा यांनी आरोपींच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. शेखर महादेव जोगळेकर ( वय 58 ), प्रणव शेखर जोगळेकर ( वय 22 दोघे राहणार सुदर्शन सोसायटी मॉडेल कॉलनी ), दयानंद सिद्धाराम इरकल ( राहणार पांडव नगर ), बाळू पांडुरंग मिसाळ ( राहणार काकडे पॅलेस जवळ कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे ( राहणार शिवणे ), रुपेश रवींद्र कदम , संतोष उर्फ बंटी दत्तात्रय हरपुडे , प्रकाश नाडकर्णी , नकुल शेंडकर ( सर्वजण राहणार कोथरूड ) यांच्यासोबत एकूण 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मयत अविनाश भिडे हे जोगळेकर यांच्याकडे मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होते. पगारावरून त्यांच्यात वाद झाला त्यानंतर जोगळेकर याने 31 ऑगस्ट 2022 रोजी भिडे यांना फोन करून लवकरात लवकर कामावर येण्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी भिडे कामावर गेले त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांना चक्कर आलेले आहे असे सांगत त्यांच्या कुटुंबियांना फोन करण्यात आला.
भिडे यांची पत्नी रेखा रुग्णालयात पोहोचल्या त्यावेळी जोगळेकर यांनी त्यांच्याकडे रक्ताने माखलेले कपडे दिले . सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून याची नोंद करण्यात आलेली होती मात्र शवविच्छेदन अहवालात भिडे यांच्या डोक्याला जखमा झाल्याचे समोर आल्यानंतर संशयित आरोपींनी त्यांना मारहाण केल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.