महाराष्ट्रात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पाडल्या त्यात काही विजयी झाले तर काहीजण पराभूत झाले मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला म्हणून एका महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आलेला आहे. आठ तारखेला आमोदा गावात ही घटना घडलेली असून याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , कल्पनाबाई सुभाष सूर्यवंशी या आमोदा गावातील रहिवासी असून त्यांच्या गावात राहणारे विनोद सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आठ तारखेला सकाळी साडेनऊ वाजता ते कल्पनाबाई यांच्या घरासमोर आले आणि तुझ्यामुळे माझा पराभव झालेला आहे असे म्हणत महिलेला शिवीगाळ केली.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने त्यानंतर मी तुला जिवंत सोडणार नाही आणि तुझ्या नवऱ्याचा देखील घात केल्याशिवाय राहणार नाही अशी देखील त्यांनी धमकी दिली. कल्पनाबाई यांनी घाबरून गेल्यानंतर तात्काळ तालुका पोलिसात तक्रार दिलेली असून संशयित विनोद सूर्यवंशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.