
सोशल मीडियावर सध्या एका पतीची जोरदार चर्चा सुरू असून त्याने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकरासोबत लावून दिलेला आहे. बिहारमधील बेगूसराय जवळील दहिया गावातील ही घटना असून आपल्या पत्नीवर कसलेही जबाबदारीचे ओझे नको म्हणून तिच्यापासून झालेल्या दोन मुलांची जबाबदारी देखील त्याने स्वतः स्वीकारलेली आहे.
पतीचे नाव अजयकुमार ( वय 24 वर्षे ) असे असून त्याची पत्नी काजल ( वय 22 ) यांचे लग्न 2008 मध्ये झालेले होते. लग्नानंतर त्यांना दोन गोंडस मुले देखील झाली मात्र बेगूसराय जिल्ह्यातील आहापुर गावचा रहिवासी असलेला राजकुमार ठाकूर याच्यासोबत काजल हिचे लग्नापूर्वी संबंध होते. लग्न झाल्यानंतर देखील ती त्याला चोरून लपून भेटत असायची.
काही कालावधी उलटल्यानंतर गावात देखील या प्रकरणाची चर्चा होऊ लागली आणि अजय याच्या परिवारातील एका व्यक्तीने काजल आणि राजकुमार यांना नको त्या अवस्थेत पाहिले. हा प्रकार अजय यांच्यापर्यंत गेल्यानंतर अजयने मनाचा मोठेपणा दाखवत राजकुमार याच्यासोबत काजलचे लग्न लावून दिलेले आहे. कुठलाही वाद न घालता त्याने हा निर्णय घेतल्यानंतर त्याचे सोशल मीडियात जोरदार कौतुक होत आहे
अजय म्हणाला की , ‘ सुरुवातीला मी हा प्रकार ऐकला त्यावेळी मला धक्का बसला मात्र मी विचार केला की तिला लग्न बंधनातून मुक्त करायचे आहे. जर ती राजकुमार याच्यासोबत खुश राहणार असेल तर मला तिच्यासोबत राहण्यात काहीही अर्थ वाटत नाही म्हणून मी तिचे लग्न राजकुमार याच्यासोबत लावून दिलेले आहे ‘ . सोशल मीडियावर त्यांच्या या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे . विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात कुठलाही गुन्हा कुणावर दाखल करण्यात आलेला नाही.