महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे हनी ट्रॅप चे प्रकरण समोर आलेले असून नाशिक जिल्ह्यातील हे प्रकरण आहे , धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मास्टरमाइंड असलेली महिला ही चक्क कृषी सहाय्यक पदावर कार्यरत आहे. ती आणि तिच्या मुलाला याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी सापळा रचून रंगेहाथ अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सारिका सोनवणे आणि मोहित सोनवणे अशी आरोपींची नावे असून आत्तापर्यंत तिने समोरील व्यक्तीकडून तब्बल एक कोटींपेक्षा जास्त रक्कम उकळल्याची माहिती समोर आलेली आहे. गंगापूर पोलिसात आरोपींच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी महिला हिने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पिठाचे विश्वस्त निंबा शिरसाठ यांच्याकडून तब्बल एक कोटी पाच लाख रुपये लुटले होते.
आरोपी सारिका सोनवणे आणि निंबा शिरसाट यांची ओळख 2014 मध्ये झालेली होती. संबंधित महिलेने ओळख झाल्यानंतर शिरसाठ यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर मुलाचे शिक्षण , आजारपण अशी वेगवेगळी कारणे देत 2019 मध्येच पंचवीस लाख रुपये उकळले होते . आरोपी महिलेने त्यानंतर वेळोवेळी गरज आहे असे सांगत समोरील व्यक्तीकडून पैसे घेतले आणि त्यानंतर मॉर्फ केलेले शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली असे फिर्यादीचे म्हणणे आहे .
तक्रारदार यांनी बदनामी नको म्हणून 50 लाख रुपये आणखीन तिला दिले मात्र तरी देखील ती दहा कोटी 50 लाख रुपये मागू लागली . आरोपी महिलेने स्वामी समर्थ सेवेकऱ्याकडून देखील काही रक्कम जमा केल्याची माहिती असून महिलेने हे व्हिडिओ व्हायरल करण्याची देखील धमकी फिर्यादी यांना दिली होती. सदर व्हिडिओ हे मॉर्फ केलेले असल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. सारिका सोनवणे ही निफाड तालुक्यातील पिंपरी इथे कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असून चार तारखेपासून सुट्टीवर गेलेली आहे .