महाराष्ट्रात युनानी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला असून आपण युनानी डॉक्टर आहोत असे सांगत परिसरातील काही शहरातील काही धनाढ्य व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांची लूट करण्याचा प्रकार मुंबईत समोर आलेला होता . माटुंगा इथे 77 वर्षीय व्यक्तीची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्यानंतर या रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्र सोबतच इतर राज्यात देखील असल्याचे दिसून येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मोहम्मद शेरू शेख मकसूद उर्फ डॉक्टर आर पटेल ( वय 49 ), मोहम्मद नफीस मोहम्मद शरीफ ( वय 39 ), मोहम्मद आसिफ मोहम्मद निसार ( वय 27 ), मोहम्मद आसिफ मोहम्मद शरीफ ( वय 44 ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे राजस्थान येथील रहिवासी आहेत .
सर्व आरोपींनी आपण युनानी डॉक्टर आहोत असे सांगत टोळी बनवली आणि त्यानंतर नागरिकांच्या घरी जाऊन उपचाराच्या बहाण्याने फसवणूक करण्यास सुरू केले. माटुंगा येथील एका 77 वर्षीय व्यक्तीची फसवणूक केल्यानंतर माटुंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींना बुधवारी गुन्हे शाखा कक्ष तीनच्या पोलिसांनी अटक केलेली आहे.
सदर टोळक्याने आतापर्यंत नऊ जणांची फसवणूक केल्याचे समोर आलेले असून आत्तापर्यंत एकूण एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे . आरोपींचे व्हाट्सअप वरील संभाषण आणि दूरध्वनीच्या माध्यमातून आरोपींपर्यंत गुन्हे शाखा पोहोचली . आरोपी तुमच्या शरीरातून पित्त काढून घेऊ असे सांगत फिर्यादी यांच्या शरीरावर जखमा करायचे आणि त्यानंतर एका मेटल क्यूबने रसायन टाकायचे आणि तेथील रंग पिवळा झाल्याचे सांगून पैसे उकळवायचे असे समोर आले आहे .