महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारांवर कुणाचा वचक आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असून नाशिक इथे दुखापतीमुळे वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात असताना जखमी व्यक्तीने पोलीस वाहनातच पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला आणि त्यांचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नाशिक शहरातील लेखानगर भागात ही घटना घडलेली असून पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी झालेले आहेत. इंदिरानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मुजफ्फर उर्फ मज्जू कुरेशी ( वय 36 राहणार वडाळा गाव ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात पोलीस नाईक नितीनचंद्र गौतम यांनी फिर्याद दिलेली आहे. संशयित कुरेशी याने दोन दिवसांपूर्वी एका नातेवाईकाच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात एक तक्रार अदखलपात्र तक्रार दाखल केली होती आणि त्या तपासासाठी पोलीस अंमलदार यांनी त्याला बोलावून घेतले होते.
फिर्यादी असलेला कुरेशी याला बोलवण्यात आले मात्र त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. पोलीस ठाण्यात आल्यावर देखील तो जखमी अवस्थेत होता आणि त्याच्या पायातून रक्त येत होते म्हणून त्याला वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलीस घेऊन जात होते त्यावेळी त्याने नितीनचंद्र यांच्यावर हल्ला केला.
नितीन चंद्र गौतम यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की , ‘ लेखानगर मार्गावरून जिल्हा रुग्णालयाकडे घेऊन जात असताना त्याने भुजबळ फार्म परिसरात आपल्याकडे सिगारेटची मागणी केली त्यावेळी त्याची समजूत काढत सिगारेट देण्यास नकार दिला मात्र त्याने कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याची संधी साधत शेजारी बसलेले गौतम यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचे तोंड दाबून गळा आवळला . ‘ कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवत गौतम यांची सुटका केली आणि संशयित व्यक्तीला ताब्यात घेत त्याला बेड्या ठोकल्या.