शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून धायरी येथील एका शैक्षणिक संस्थाचालकाकडे दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केलेली आहे . खंडणी विरोधी पथकाकडे दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी ‘ हातपाय तोडून तुमचा गेम करू ‘असे देखील त्यांनी म्हटल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अक्षय रंगनाथ सावंत ( वय 29 राहणार धायरेश्वर विला धायरी ), प्रदीप अंकुश दोडके ( वय पस्तीस राहणार दांगट पाटील नगर वडगाव ) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून त्यांच्या विरोधात एका 45 वर्षीय संस्थाचालकाने फिर्याद दिलेली आहे.
फिर्यादी व्यक्ती यांचे प्री स्कूल आणि गुरुकुल विद्यालयाचे बांधकाम सुरू असून आरोपींनी पुणे महापालिकेत माहिती अधिकार कायदाअंतर्गत अर्ज केलेला होता . तो अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी फिर्यादी यांच्याकडे दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आणि तडजोड करून तीन लाख रुपये मागितले त्यानंतर फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली.
आपल्या विरोधात खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार करण्यात आलेली आहे ही बाब समजताच दोन्ही आरोपींनी फिर्यादी यांना धमकावत तू माझ्याविरुद्ध खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली आहे ती तक्रार मागे घे नाहीतर तुझे हातपाय तोडून तुझा गेम करेल असे आरोपी यांनी म्हटल्याचा दावा फिर्यादी यांनी केलेला आहे.