आपल्यापैकी अनेक व्यावसायिक व्यवसाय वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात मात्र नाशिक इथे देण्यात आलेली एक ऑफर या व्यावसायिकाला चांगलीच महागात पडलेले असून त्यानंतर व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दुकानाच्या उद्घाटनाबद्दल सोशल मीडियावर या व्यक्तीने पावभाजी अल्प दरात असल्याची जाहिरात केलेली होती. विशेष म्हणजे त्याच्या या जाहिरातीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आणि नाशिकमधील रथचक्र चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी जमू लागली . मिलिंद बाबुराव कुलकर्णी ( राहणार मोदकेश्वर मंदिराजवळ इंदिरानगर ) असे या व्यावसायिकाचे नाव आहे.
कुलकर्णी यांनी रथचक्र चौकात हॉटेल पावभाजी पांडा नावाने दुकान सुरू केलेले होते . दुकानाच्या उद्घाटनाची त्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरात केली आणि त्यानंतर ग्राहकांनी पावभाजी घेण्यासाठी गर्दी केल्याने तिथे वाहतूक कोंडी निर्माण झाली. नंबर लावून मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करून ग्राहकांची एकच झुंबड दुकानावर सुरू झाल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला म्हणून त्यानंतर पोलीस शिपाई गणेश राहिंज यांनी फिर्याद दिली आणि व्यावसायिकावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.