फसवणुकीचा एक अद्भुत असा प्रकार सध्या उल्हासनगर इथे समोर आलेला असून एका ज्वेलर्सने सोन्याच्या अंगठ्या पॉलिश करण्यासाठी कारागिराकडे दिल्या मात्र कारागीर तब्बल एक कोटी 38 लाख रुपयांचे हे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , जानू मनोहरलाल बालानी ( वय 36 वर्ष ) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून त्याने ऑर्डरप्रमाणे अंगठ्या बनवून देण्यासाठी आणि पॉलिश करण्यासाठी इतर व्यापाऱ्यांकडून सुमारे एक कोटी 38 लाख रुपये किमतीच्या काही सोन्याच्या अंगठ्या घेतलेल्या होत्या.
सोन्याचे दागिने पॉलिश करणारा कारागीर मुजिबर इब्राहिम शेख याच्याकडे त्यांनी हा ऐवज पॉलिश करण्यासाठी दिला मात्र त्याने चार डिसेंबर रोजी तुम्हाला दागिने पॉलिश करून देतो असे सांगत दागिने ठेवून घेतले आणि त्यानंतर तो फरार झाला. उल्हासनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलीस निरीक्षक चेतन बागुल पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.