शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये अंधश्रद्धेचा एक अजब प्रकार पाषाण इथे समोर आलेला असून कन्सल्टन्सीच्या नावाखाली चक्क जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळावे म्हणून गंडेदोरे बांधून राख खायला देण्यात येत होती सोबतच पाय धुतलेले पाणी पिण्यास देखील एक तरुणी भाग पाडत होती. आपल्याकडे अतींद्रिय शक्ती असल्याचा देखील दावा ती करायची आणि एका युवकाची तिने यात तब्बल दीड लाख रुपयांची फसवणूक केली आणि त्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिचा हा कारनामा समोर आणलेला असून वृषाली ढोले शिरसाट असे आरोपी तरुणीचे नाव आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विशाल विमल ( बोपोडी पुणे ) यांना वृषाली आणि तिचे साथीदार जादूटोणा भोंदूगिरी आणि फसवणूक करत असल्याची माहिती मिळालेली होती त्यानंतर साध्या वेशातील चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याचे कर्मचारी महिलेच्या कार्यालयात शनिवारी दाखल झालेले होते.
आरोपींनी विशाल यांना कन्सल्टन्सी फी एक हजार रुपये भरायला लावली आणि आतील रूममध्ये त्यानंतर त्यांना नेण्यात आले . वृषाली ढोले शिरसाठ कुठलीही समस्या न विचारता त्यांच्या हाताला गंडा बांधून राख खाण्यास दिली . अघोरी अनिष्ट आणि जादूटोणा प्रकार करून ती लोकांना फसवत असल्याचा प्रकार समोर आला त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिच्याकडून जादूटोण्याच्या वस्तू जप्त केलेल्या आहेत.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एक 23 वर्षीय तरुणाने वृषाली संतोष ढोले शिरसाट हिच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिलेली आहे . वृषाली हिच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायदा कलम तीन दोन भारतीय दंड विधान संहिता कलम 420 , 506 ( 2 ), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वृषाली संतोष ढोले शिरसाट ( वय 39 राहणार वंशज गार्डन पाषाण ) हिच्यासोबत तिची साथीदार माया राहुल गजभिये ( वय 45 राहणार विठ्ठल नगर पाषाण ) आणि सतीश चंद्रशेखर वर्मा ( वय 33 राहणार गणेश होस्टेल पाटील नगर बावधन ) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती आहे.