शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या एका सहाय्यक पोलीस फौजदाराला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेले आहे. शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथील हे प्रकरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार , लोकसेवक म्हणून काम करणारे राजेंद्र दगडू गवारे (वय 53 वर्ष सहाय्यक पोलीस फौजदार नेमणूक शिरूर पोलीस स्टेशन ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून एका 65 वर्षीय व्यक्तीने त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.
तक्रारदार आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला असून या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागण्यात आलेली होती. तडजोड करण्यात आल्यानंतर दहा हजार रुपये देण्याचे ठरले आणि दहा हजार रुपये स्वीकारताच या लोकसेवकाला पकडण्यात आलेले आहे. पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर , पोलीस शिपाई प्रवीण तावरे , पोलीस शिपाई आशिष डावकर यांनी कारवाईत सहभाग घेतला होता .