कायदा सुव्यवस्थेचा डांगोरा पिटणाऱ्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या नेत्यांचे कारनामे रोज समोर येत असून असाच एक अजब प्रकार सध्या समोर आलेला आहे . उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क बोगस सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून रोजंदारीवर आणलेल्या नागरिकांची लग्न लावून शासकीय अनुदान लाटण्यात आलेले आहे. 25 जानेवारी रोजी बलिया जिल्ह्यातील मनियार येथे हा लग्न सोहळा आयोजित करण्यात आलेला होता
२०१७ मध्ये दुर्बल आणि गरीब वर्गातील मुलींसाठी युपी सामूहिक विवाह योजना सुरु करण्यात आली होती त्यामध्ये उत्तर प्रदेश सरकार गरजू मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये खर्च करते . त्यातील 35 हजार रुपये नवरीच्या बँक खात्यात जमा होतात आणि गरजेचे दागिने आणि घरगुती साहित्यासाठी दहा हजार रुपये तर मांडवासाठी सहा हजार रुपये अनुदान दिले जाते. ही योजना प्रत्येक जिल्ह्यात लागू करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेले होते.
स्थानिक अधिकारी आणि स्थानिक राजकारणी यांनी संगनमत करून सरकारचा निधी लाटला. 25 जानेवारी 2024 रोजी बलियातील मनियार येथे 560 पेक्षा जास्त जोडप्यांनी लग्न केल्याचा दावा करण्यात आलेला होता आणि या सोहळ्यासाठी भव्य मंडप , वाजंत्री, मंत्रोच्चार असा मोठा सामुदायिक सोहळा करत आहोत असे आयोजन करण्यात आले होते मात्र वधूसमोर मोबाईलमध्ये व्यस्त असलेला वर तसेच स्वतःच्या हाताने स्वतःच्या गळ्यात वरमाला घालणाऱ्या वधू या विवाह सोहळ्यात दिसून आल्या सोबतच एका लहान मुलाला देखील वर म्हणून बसवण्यात आलेले होते.
सदर प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची चौकशी करण्यात आली त्यावेळी विवाह सोहळ्यासाठी म्हणून आणलेले वर वधू हे चक्क रोजंदारीवर काम करत असल्याचे समोर आलेले असून त्यात काही अल्पवयीन देखील आहेत. सरकारी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या व्यक्तींना आणि काही अधिकारी आणि राजकारणी यांना कायद्याचा कुठलाच धाक राहिलेला नाही हे या घटनेनंतर समोर आलेले आहे.