
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक कंबलवाला बाबा चांगलाच चर्चेत आलेला होता आपल्याकडे एक जादूची घोंगडी आहे असे आमिष दाखवत हा बाबा वेगवेगळ्या नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत होता. आता हा बाबा महाराष्ट्रात दाखल झालेला असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून त्यामध्ये त्यांनी या कंबलवाल्या बाबावर कारवाईची मागणी केलेली आहे.
मुक्ता दाभोळकर यांनी एक व्हिडीओ शेअर केलेला असून त्यात , ‘ राजस्थान येथून आलेला कंबलवाला बाबा हा सध्या भाजप आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात विकलांग लोकांवर उपचाराचा देखावा करत असून यात हे नागरिक बरे झाल्यासारखे दाखवत आहे . आपल्या अंगात जादुई शक्ती असल्याचे हा बाबा सांगत असून राम कदम आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत हा प्रकार सुरु आहे .सदर प्रकार कायद्याने गुन्हा असून याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आलेले असून गरज पडली तर भाजप आमदार राम कदम आणि पोलीस अधिकारी यांनी देखील भूमिका बाजीराव बजवावी , ‘ असेही त्यांनी म्हटलेले आहे. गणेश भाई गुर्जर असे या बाबाचे खरे नाव असून मूळचा तो राजस्थान येथील रहिवासी आहे. त्याच्या खांद्यावर एक काळी घोंगडी आणि डोक्यावर काळी पगडी असते. आपल्या घोंगडीने आपण अनेक जणांना आजारातून बरे करतो असा या बाबाचा दावा आहे.
बाबाच्या म्हणण्यानुसार, माझ्या घोंगडीमध्ये आध्यात्मिक शक्ती आहे. ही घोंगडी मला आंब्याच्या झाडावर मिळालेली असून ही घोंगडी ज्या कुणाच्या अंगावर मी टाकेल तो बरा होईल. देवाने मला अशी अद्भुत शक्ती दिलेली आहे. देवाच्या आशीर्वादाने ही सिद्धी मला प्राप्त झालेली असून कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर घोंगडी टाकल्यानंतर आणि त्याची नाडी आणि शीर पाहिल्यानंतर मला आजाराची माहिती होते. 32 वर्षांपासून मी हे काम करत असून शिबिर लावून आपण नागरिकांवर उपचार करतो , ‘ असे म्हटलेले आहे.
शिबिरात येण्यासाठी सामान्य नागरिकांना 50000 पासून एक लाख रुपये आकारण्यात येतात आणि तिथे आल्यानंतर जेवणाचे ताट, बिसलरी पाणी अशा अनेक गोष्टी शिवाय वेगवेगळे चहा आणि यंत्र विकून या बाबाची मोठ्या प्रमाणात कमाई होते. हवन करण्यासाठी नारळांची गरज पडते त्यामुळे नारळांचा देखील व्यापार करून हा बाबा मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहे. शिबिर व्यवस्थापनात देखील या बाबांचे भक्त कार्यरत असून हे व्यवस्थापन करण्यासाठी एक रुपयाचा देखील खर्च या बाबाकडून केला जात नाही.