महाराष्ट्र हादरला..सैन्यातील पतीकडून बायको अन मुलीचा खून

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत धक्कादायक असे प्रकरण नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात समोर आलेले असून बोरी खुर्द येथे पत्नी आणि मुलीचा अत्यंत अमानुषपणे खून केल्याचा प्रकार 13 सप्टेंबर रोजी समोर आलेला आहे. 13 तारखेला संध्याकाळी कंधार तालुक्यातील पळसवाडी इथे मयत महिला आणि तिच्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले असून या प्रकरणातील आरोपी दुसरा कोणी नसून चक्क महिलेचा पती असून तो सैन्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , एकनाथ मारुती जायभाये असे सैन्यदलात कार्यरत असलेल्या या सैनिकाचे नाव असून सुट्टीसाठी तो गावाकडे आलेला होता त्यावेळी त्याची पत्नी आठ महिन्यांची गरोदर होती. आरोपीने त्याची पत्नी भाग्यश्री आणि अवघ्या तीन वर्षांची मुलगी सरस्वती यांचा गळा आवळून खून केला आणि स्वतःहून माळाकोळी पोलीस ठाण्यात तो हजर झालेला होता. मयत भाग्यश्री यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती एकनाथ , सासरा मारुती , सासू अनुसया , दीर दयानंद यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर पोलिसांनी तीन जणांना अटक केलेली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी एकनाथ जायभाये याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याकारणातून तसेच आपल्याला मुलगा होण्याची आशा होती मात्र मुलगीच होईल या भावनेतून हा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिलेली असून त्याचा रक्तदाब वाढल्यानंतर त्याला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे . माळाकोळी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.


Spread the love