जेव्हा कुठेही न्याय मिळत नाही त्यावेळी माणूस न्यायालयात धाव घेतो मात्र न्यायव्यवस्थेतच जर गडबड असेल तर.. असाच एक प्रकार सातारा इथे समोर आलेला असून फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित व्यक्तीला जामीन मिळवून देण्यासाठी चक्क पाच लाख रुपयांची लाच न्यायाधीशांनी मागितली आहे .
सातारा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासोबत चार जणांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम, खाजगी व्यक्ती किशोर संभाजी खरात , आनंद मोहन खरात आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली होती . मुख्य आरोपी न्यायाधीश धनंजय निकम यांनी त्रयस्थ व्यक्तीच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची लाच जामीन मंजूर करून देण्यासाठी मागितली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सापळा रचण्यात आला त्यामध्ये धनंजय निकम यांचे नाव असल्याचे समोर आले. फिर्यादी महिला यांचे वडील सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन मिळवण्यासाठी त्यांनी धनंजय निकम यांच्या कोर्टाकडे अर्ज केलेला होता तो मंजूर करण्यासाठी त्यांना पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आलेली होती.