पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आंधळगाव आहे ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक ठराव केलेला असून गावातील जी मुले आपले वृद्ध आई-वडील यांची जबाबदारी नाकारून त्यांचा सांभाळ करत नाही त्यांना ग्रामपंचायतीचे कुठल्याही स्वरूपाचे दाखले मिळणार नाही असा ठराव पास केलेला आहे . शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथील ग्रामपंचायतचा हा ठराव सरपंच पुष्पा दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेत पास करण्यात आलेला आहे.
ग्रामसभेच्या वतीने या संदर्भात अधिक माहिती देताना , ‘ समाजामधील आई-वडिलांची संपत्ती मुलांच्या नावावर करून दिल्यानंतर अनेक लाडाचे दिवटे त्यानंतर त्यांचा सांभाळ करत नाही त्यामुळे वृद्ध आई-वडिलांना अनाथासारखे आयुष्य जगावं लागते . उतारवयात त्यांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्यामुळे आम्ही आंधळगाव येथील जो कोणी आई वडिलांचा सांभाळ करणार नाही त्याला ग्रामपंचायत कुठल्याही स्वरूपाचे दाखले देणार नाही ,’ असे म्हटलेले आहे.
आंधळगाव ग्रामपंचायतच्या या ठरावाचे परिसरात जोरदार कौतुक केले जात असून सरपंच पुष्पा दाभाडे , उपसरपंच ज्ञानदेव सोनवणे , माजी उपसरपंच सुभाष सरोदे, लक्ष्मण दाभाडे रामभाऊ कोळेकर , शुभांगी सुळक , कांताबाई थोरात यांच्यासोबत इतर ग्रामस्थांनी मिळून हा ठराव पास केलेला आहे.