देशात आजकाल पैसे कमवण्यासाठी कोण काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही मात्र अडचणीत पडलेले सामान्य नागरिक हेच या चोरांचे एकमेव टार्गेट राहिलेले नाही तर अनेक मोठ्या व्यक्ती देखील अशा चोरट्यांना भुलतात आणि फसवणूक करून घेतात अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आली असून मिरज येथे किडनी मिळवून देण्याच्या आमिषाने हैदराबाद आणि विशाखापटनम येथील दोन भामट्यांनी माजी आमदार परशुराम उपरकर ( वय 59 राहणार कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग ) यांना तब्बल दहा लाखांना गंडा घातला.
उपलब्ध माहितीनुसार, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या 4 वर्षांपूर्वी दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत त्यामुळे किडनी प्रत्यारोपणासाठी ते सिंधुदुर्ग येथून मिरज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते मात्र किडनी मिळण्यास त्यांना काही अडचणी येत होत्या. अशात खासगी रुग्णालयात आल्यानंतर नंद गोपाल ( राहणार चेन्नई ) नावाच्या व्यक्तीशी त्यांची ओळख झाली. नंद गोपाल याने आपण वैद्यकीय व्यवसायात असून अनेक मोठे मोठे डॉक्टर आपल्या ओळखीचे आहेत असे सांगितले तसेच या डॉक्टरांसोबत त्यांचे त्याचे फोटो देखील दाखवले त्यामुळे उपरकर यांचा नंद गोपाल याच्यावर विश्वास बसला.
किडनी प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी उपरकर यांच्याकडून त्याने आधी पाच लाख रुपये ऍडव्हान्स घेतला आणि त्यानंतर हैदराबादमध्ये व्यंकटेश राव नावाच्या एका व्यक्तीकडे परशुराम उपरकर यांना घेऊन गेला. तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या वैद्यकीय तपासण्याचा बनाव रचत आणखी पाच लाख रुपये घेतले मात्र दहा लाख रुपये घेऊन देखील किडनी प्रत्यारोपण पूर्ण केले नाही.
त्याला पैसे देऊन एक वर्ष होऊन गेले मात्र तरीही त्याच्याकडून काहीच मदत होत नाही हे लक्षात आल्यानंतर उपरकर यांनी त्याला पैसे परत देण्याची मागणी केली मात्र त्याने टाळाटाळ करत उपरकर यांना पैसे देण्यास नकार दिला, त्यामुळे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी यात दोन व्यक्तींच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.