जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार मंगेश चव्हाण हे देखील दाखल झाले आणि त्यांनी उपोषण करणारे व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केलेली आहे मात्र मनोज जरांगे अद्यापही आपल्या उपोषणावर ठाम आहेत. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि कथित गोळीबार केल्यानंतर राज्यभरात भाजप आणि सोबतच्या पक्षांवर टीका केली जात असून डॅमेज कंट्रोलसाठी गिरीश महाजन जालन्यात उपोषणकर्त्या व्यक्तींची भेट घेण्यासाठी गेले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी , ‘ आमच्या पोरांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे तरीदेखील पोलिसांना जबाबदार पोलिसांना बडतर्फ करण्यात येत नाही . आमच्या आई-वडिलांवर हल्ला करण्यात आला. मराठवाड्यातील मराठ्यांना जीआर काढा आणि आरक्षण देऊन टाका. मी शब्द दिलेला आहे जोपर्यंत जीआर दिसणार नाही तोपर्यंत माघार नाही ‘, असे देखील ते म्हणाले.
गिरीश महाजन यांनी जीआर काढला तरी आरक्षण एक दिवसही कोर्टात टिकेल का ? असा प्रश्न त्यांना विचारला होता त्यावेळी जरांगे पाटील यांनी आम्ही लोक पाठवतो त्यांच्याशी चर्चा करा असे सांगितले आहे. आरक्षण कसे गेले यात आम्हाला पडायचे नाही मात्र मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्या असे देखील ते म्हणाले . मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी आरक्षण द्या आणि विषय संपून टाका. 2004 चा मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर काढा , असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.
मराठा आणि कुणबी एकच असल्याचे अनेक पुरावे इतिहासात आढळतात मात्र अनेक गावांमधील जुने रेकॉर्ड नैसर्गिक आपत्तीत नष्ट झाले असल्याकारणाने अनेक गोरगरिब कुटुंबातील मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही त्यामुळे शिक्षणासाठी ओपन कॅटेगिरीची असलेली फी या कुटुंबांना भरावी लागते. सरकार दरबारी रेकॉर्ड नसल्याचा फटका मोठ्या प्रमाणात सध्या गरीब कुटुंबातील मराठा बांधव सोसत आहेत.