मुंबईत दररोज १२ तास निर्बंध; १५ जानेवारीपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कडक नियम लागू

करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील निर्बंध १५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आले आहेत. प्रशासनाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार आता सार्वजनिक ठिकाणी जाण्याबाबतचे निर्बंधही कायम राहणार आहेत. प्रशासनाने आपल्या आदेशात मुंबईतील सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत निर्बंध १५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आले असल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना संध्याकाळी पाच ते पहाटे पाच दरम्यान समुद्रकिनारे, मोकळे मैदान, समुद्र किनारे, उद्याने किंवा तत्सम सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे.

मुंबई पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, मानवी जीवन, आरोग्य किंवा सुरक्षिततेला धोका टाळण्यासाठी आणि कोविड-१९ विषाणूचा प्रसार कमी करण्याच्या उद्देशाने हे निर्बंध लादण्यात आले आहेत. “कोविड-१९चा धोका वाढल्याने आणि नवीन ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शहराला धोका आहे,” असे आदेशात म्हटले आहे. मात्र प्रशासनातर्फे आधीच नवीन वर्षाच्या आधी सर्व मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.

तिसऱ्या कोविड लाटेच्या भीतीनंतर महाराष्ट्रात १९८ नवीन ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ५,३६८ नवीन करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  गेल्या दोन दिवसांत राज्यातील रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात २,१७२ नवे रुग्ण आढळले होते. ४८ तासांनतर हीच संख्या पाच हजारांपेक्षा जास्त झाली. एवढय़ा प्रंचड प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणाही सावध झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही १८ हजारांवर गेली आहे.

Share