पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या गंभीर रुग्णांची संख्या कमी असली तरी, मागील पाच दिवसांपासून सातत्याने एका दिवसातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली आहे. बुधवारी (ता.१९) दिवसात जिल्ह्यात १२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील नऊ मृत्यू आहेत. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १२ हजार ६३३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पुणेकरांनी कोरोनाबाबत घाबरू नये. परंतु अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ६ हजार ४४१ नवे रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ३ हजार ५०५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ९१८, नगरपालिका हद्दीत ४६० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ३०९ नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील नऊ मृत्यूबरोबरच जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एक मृत्यू आहे.
दिवसभरात ८ हजार ३५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४ हजार ८५७ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २ हजार ६४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एक हजार ९, नगरपालिका हद्दीतील २५३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १७४ जण आहेत. दरम्यान जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा पाऊण लाखाच्या घरात पोचला आहे.