मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात आत्तापर्यंत अनेक आत्महत्या झाल्याचे प्रकार समोर येत असून पुणे जिल्ह्यात चक्क एका वृद्ध व्यक्तीने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण तसेच मुलाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून आपण आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , व्यंकट नरसिंग ढापरे ( वय 60 वर्ष ) असे आत्महत्या केलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव असून पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथील ते राहणारे होते . आळंदी येथे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललेले असून इंद्रायणीच्या नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आलेला आहे.
शुक्रवारी ते पुण्यातील नऱ्हे येथून निघून आळंदी इथे आलेले होते. आळंदी येथील इंद्रायणी नदीवरून सिद्धबेट बंधाऱ्यात त्यांनी उडी मारली त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध शुक्रवारी रात्रीपासूनच सुरू केलेला होता मात्र ते मिळून आले नाहीत. मूळचे ते लातूर जिल्ह्यातील असून पुण्यात काही वर्षांपूर्वी स्थायिक झालेले होते.
त्यांच्या मृतदेहांसोबत एक चिठ्ठी आढळून आलेली असून त्यामध्ये , ‘ मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे तसेच माझ्या मुलाला सरकारी अनुकंपावर नोकरी मिळाली नाही. सरकारच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे माझा मुलगा बेकार झालेला आहे. मी स्वतः सरपंच असताना निराधारांसाठी अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न केले त्याला देखील यश आले नाही. आत्तापर्यंत अनेकदा मराठा आंदोलनात संघर्ष केला मात्र शासन स्वतःची खळगी भरण्यासाठी व्यस्त आहे त्यामुळे न्याय मिळत नाही म्हणून निराशेपोटी आपण आत्महत्या करत आहोत ‘, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे.