आत्तापर्यंत आपण सामान्य नागरिकांच्या , पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात वृत्त वाचलेले असेल मात्र उत्तर प्रदेशातील बदायू येथे चक्क एका महिला न्यायाधीशाने शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे . त्यांच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , ज्योत्स्ना राय ( वय 27) असे मयत महिला न्यायाधीश यांचे नाव असून दिवाणी खटल्याच्या न्यायाधीश कनिष्ठ पदावर त्या कार्यरत होत्या . जज कॉलनी संकुलाच्या पहिल्या मजल्यावर त्या राहत असायच्या तिथेच त्यांनी बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेतला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला . त्यांचे वडील अशोक कुमार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे.
माझी मुलगी ज्योत्स्ना ही खूप धाडसी होती ती आत्महत्या करू शकत नाही तिने इतरांना न्याय मिळवून देण्याचे काम केले . तिचा कुणीतरी खून करून तिचा मृतदेह लटकवून दिलेला आहे असा आरोप तिच्या वडिलांनी केलेला असून पोलिसांनी देखील निष्काळजीपणा करत तपास केलेला नाही असाही आरोप त्यांनी केलेला आहे.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शी यांनी मात्र अशोक कुमार यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत पोलिसांनी पूर्णपणे तत्परतेने आणि सावधगिरीने तपास केला . कुटुंबीय त्रस्त असल्याकारणाने असे बोलत आहेत. शव विच्छेदन अहवाल आलेला असून कागदपत्रे फॉरेन्सिक अहवाल आणि कॉल डिटेल तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे म्हटलेले आहे.