पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढलेले पहायला मिळत असतानाच अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी परिसरात उघडकीस आली असून ‘ भाई ‘ न म्हणाल्याने आरोपीने सदर युवकाला चक्क जमिनीवर पडलेली बिस्किटे खायला लावण्याची संतापजनक घटना थेरगावातील गणेशनगर इथे घडलेली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला.
उपलब्ध माहितीनुसार रोहन वाघमारे या सराईत गुन्हेगारसह प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रेम शिंदे (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पीडित २० वर्षीय युवकाने त्यांच्या विरोधात वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे . भाई न म्हणाल्याच्या कारणावरून वरील चार साथीदारांनी तरूणाला कमरेचा बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली आणि जमिनीवर बिस्किटे टाकुन ती खाण्यास भाग पाडली.
आरोपी रोहन वाघमारे याची तडीपारी नुकतीच संपलेली असून त्यामुळे तो हददीत आला होता. आरोपी रोहन याने आधी फिर्यादी तरूणाला मोबाईलवर कॉल करून शिवीगाळ केली आणि भेटण्यास बोलविले. मंगळवारी २५ तारखेला रात्री साडेदहाच्या सुमारास पीडित तरुण गेला असताना त्यांच्यात वाद सुरु झाला आणि रोहन याने ‘ तू मला रोहन का म्हणालास, मला भाई का नाही म्हणाला ? मी या एरियाचा भाई आहे , ‘ असे म्हणत कमरेच्या बेल्टने मारहाण करत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग पाडले. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर या प्रकारची चर्चा झाली असून पोलीस तपास सुरु आहे .