क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच किरण गोसावी याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे तर वानवडी पोलीस स्टेशनमध्येही आज दिवसभरात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात पुढे काय कारवाई करणार ? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहे. किरण गोसावी याला बोलते केल्यास अनेक गोष्टींचा पर्दाफाश होणार आहे .
किरण गोसावीने परदेशात नोकरी लावण्याच्या बहण्याने फसवणूक केल्याप्रकरणी बहुतांश तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. दोन तरुणांना परदेशात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाल्याचा नवाब मलिक यांनीही तसा दावा केला होता. किरण गोसावी हा पंच म्हणून क्रूझवर कसा गेला ? त्याचे पाठीराखे कोण आहेत ? हे शोधण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.