सोलापूर जिल्ह्यातील गाजलेल्या उंदरगाव आश्रम येथील महाराज मनोहरमामा भोसले याने सोमवारी शक्तिप्रदर्शन करत करमाळा पोलीस ठाण्यात हजेरी लावली. बलात्काराच्या आरोपातून बार्शीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नुकतीच त्याची जामिनावर सशर्त सुटका केली होती.
करमाळा पोलिसांनी सोमवारी मनोहर मामाला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि ‘ न्यायालयाने जामीन मंजूर करताना ज्या अटी घातलेल्या आहे त्या अटींचे आणि शर्तींचे पालन करा नाहीतर कारवाई करण्यात येईल ‘, असे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी मनोहर मामाला सांगितले आहे.
बलात्काराच्या आरोपात संशयित आरोपी म्हणून उंदरगाव येथील मनोहरमामा भोसले याला करमाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तब्बल एकशे बत्तीस दिवसांनी बार्शी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने शनिवारी त्याला जामीन मंजूर केला आणि त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण ?
करमाळा तालुक्यातील उंदरगाव इथे मनोहर भोसले यानं उभारलेल्या आश्रमात दर अमावस्येला जणू बाजार फुलेला असायचा. 3000 देणाऱ्यांना रांगेत उभं राहण्यास सांगितलं जायचं तर एकवीस हजार रुपये देणाऱ्यांना थेट मनोहर भोसलेसमोर उभं केलं जायचं. याठिकाणी येणाऱ्या भोळ्या भाबड्या भक्तांच्या मनात मनोहर उर्फ मनोहरमामा भोसले जणू सद्गुरु बाळूमामाचा अवतार अशी धारणा होती. अक्षरश: बाबाच्या दारात मोठे मोठे लोक येऊन माथा टेकवत असल्याने ह्या बाबाचे प्रस्थ चांगलेच वाढले . सुरुवातीला स्थानिक पातळीवर काही विरोध झाला मात्र राजकीय अनास्था आणि पैशाची ताकत यावर हा विरोध कमी कमी होत गेला.
इंदापूरातल्या लारसुणे गावचा मूळ रहिवासी असलेला मनोहर हा डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून आपली गुजराण करत होता. त्यानंतर एके दिवशी हा अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर पुन्हा याच गावात आपण बंगाली विद्या शिकून आल्याचा दावा त्याने केला आणि आजूबाजूच्या गावची लोक भूत उतरवायला त्याच्याकडे येऊ लागली. निव्वळ भुतावर आपण जास्त मोठे होऊ शकत नाही म्हणून आता काहीतरी मोठे करावे लागेल हे लक्षात येताच त्याने चक्क आपल्या अंगात बाळूमामा आल्याची पेव सोडून दिली आणि बाबाच्या हस्तकांनी याचे भरपूर मार्केटिंग करत सुरुवातीला गोरगरीब लोक आणि त्यानंतर धनाढ्य लोकांना देखील बाबाच्या भक्तीत ओढून घेतले.
काही कालावधीतच मन्या म्हणून ओळखला जाणारा आता ‘सद्गुरू मनोहरमामा’ बनला . गावात झोपडीत राहणारा मनोहर शिवारात गेला आणि दीड एकरात त्यानं भक्तांनी दिलेल्या पैशावर त्याने आश्रमही बांधला आणि बाबाच्या दिमतीला अलिशान गाड्याही आल्या. मनोहर भोसलेच्या आश्रमात उंदरगाव आणि परिसरातील चार-पाच गावचे लोक जायचे बंद झाले कारण आता बाबा केवळ भूत उतरवणारा बाबा राहिला नव्हता तर तो सद्गुरू झाला होता . आश्रमातील अनेक रंजक कथा आसपासच्या गावात पसरू लागल्याने स्थानिक पातळीवर बाबाचा प्रभाव कमी झाला मात्र बाहेरून मार्केटिंग करून ओढलेले भक्त गर्दी करू लागले. भक्तजनांच्या टोळ्या रोज धडकत असल्याने बाबाला स्थानिक नागरिकाचे फारसे घेणे देणे राहिले नाही .
स्वतःला ज्योतिषाचार्य म्हणून घेणारा मनोहर भोसले भक्तांचं रोगनिवारण करत असल्याचा दावा करत होता. कर्करोग झालेल्या रुग्णास बरा करतो म्हणून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहरमामा भोसले याला बारामती पोलिसांनी साताऱ्यातल्या सालपे डोंगरातून ताब्यात घेतलं आहे मात्र दुसरीकडे याच मनोहर बाबाच्या आईला जेव्हा अर्धांगवायू झाला त्यावेळेस त्याने आईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. तेव्हा या मनोहर मामाची शक्ती आणि बुवाबाजी कुठे गेली होती? असा सवाल आता विचारला जात आहे. सोलापुरात आश्रमात येणाऱ्या एका महिला शिष्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा देखील मनोहर भोसलेवर दाखल करण्यात आल्याने त्याला पोलीस कोठडी खावी लागली होती मात्र आता तो बाहेर आला आहे.