पुणे शहर आणि परिसरात गुंडगिरी वाढण्यास राजकीय नेते देखील कारणीभूत असल्याचे अनेक प्रकार समोर येत असतानाच आता चक्क भाजपाचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून त्यांनी खंडणी घेतल्याचे त्यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे .
उपलब्ध माहितीनुसार , केशव घोळवे, गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनश्याम यादव, मलका यादव, हसरत अली शेख, अशी अटक झालेल्या आरोपींची नावे असून मोहम्मद अली शेख (वय ४५, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
आरोपींनी भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे रुपयांची पावती करायला भाग पाडून फिर्यादी व इतर व्यापार यांची फसवणूक केली आणि शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून ५५ हजार रुपयांची खंडणी घेतली आणि पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादीने त्यास विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीचे म्हणणे आहे.
फिर्यादी व इतर व्यापाऱ्यांची नेपाळी मार्केट येथील जागा मेट्रो प्रकल्पाला जात असल्याने त्यांना महापालिकेकडून पर्यायी जागा एकूण १०० गाळे देण्यात येणार आहेत. फिर्यादी व इतर व्यापाऱ्यांना महापालिकेकडून गाळे मिळवून देतो, असे आश्वासन आरोपींनी दिले होते .शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने ५५ हजार रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर पुन्हा एक लाखांची मागणी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. नेपाळी मार्केट, डेक्कन होंडा शोरूमच्या समोर पिंपरी येथे २०१९ ते १ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.