कोरोना काळात महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली होती. अमरावती जिल्ह्यात कोरोना चाचणीच्या नावाखाली चक्क युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेणाऱ्या विकृताला अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जुलै 2020 मध्ये घडलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती बुधवारी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात आपला निर्णय देऊन आरोपीला शिक्षा ठोठावली आहे.
काय आहे प्रकरण ?
अमरावती शहरातील एका मॉलमध्ये काम करणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मॉलमधील इतर कर्मचाऱ्यांची देखील चाचणी करण्यात येत होती त्यावेळी बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर रुग्णालयात असलेल्या कोविड तपासणी लॅब मधील कर्मचारी अलकेश देशमुख याने एका युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला. सदर महिलेने ही बाब आपल्या भावाला सांगितली असता स्वॅब घेण्याची अशी कुठलीही पद्धत नसल्याचे समजताच संबंधित युवतीने शहर पोलीस आयुक्तालयाच्या बडनेरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
आरोपी अलकेश देशमुख विरोधात पोलिसांनी भादवी 376 नुसार गुन्हा दाखल केला होता तर मागील दीड वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. आज बुधवारी न्यायाधीश व्हि. एस.गायकी यांनी आपला निर्णय देतांना आरोपी अलकेश याला कलम 376 (1) अंतर्गत दहा वर्षे सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंड तसेच कलम 354 अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे .