धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे उघडकीस आला असून पैसे घेऊन लग्न करून झालेल्या नववधूला बेड्या ठोकण्यात आलेले आहेत. तिला आठ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी असलेल्या धनंजय हिरालाल सोनार या तरुणाचा यशवंत उर्फ दादू विजय पाटील ( राहणार सांगली खुर्द ) यांची मानलेली बहिण असलेल्या सरिता प्रकाश कोळी( राहणार अंजाळे ) हिच्यासोबत विवाह ठरलेला होता. सदर विवाहासाठी सव्वा लाख रुपये द्यावेत तसेच लग्नाचा खर्च मुलाने करावा असे ठरविण्यात आले होते त्याप्रमाणे 85 हजार रुपयांची रोख रक्कम देण्यात आली होती आणि उर्वरित रक्कम नंतर देण्यात येणार असल्याचे ठरले होते.
14 डिसेंबर 2021 रोजी देहू आळंदी पुणे येथे अलंकापुरी मंगल कार्यालय येथे हे लग्न पार देखील पडले मात्र त्यानंतर लग्नाच्या सात दिवसांनी यशवंत उर्फ दादू विजय पाटील हा नववधू सरिता कोळी हिला तिच्या आईच्या भेटीसाठी मी घेऊन जात आहे असे सांगितले आणि तो तिला घेऊन गेला तो त्यानंतर तो पुन्हा आलाच नाही. दुसरीकडे पतीने तिचा शोध सुरू केला मात्र ती गायब झाल्याचे समजले त्यानंतर तिचा मानलेला भाऊ असलेला यशवंत हा देखील गायब झाला दोघेही आढळून येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे सोनार यांच्या लक्षात आले.
हतबल झालेल्या सोनार यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी 4 फेब्रुवारी रोजी यावल पोलिसात त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी तपास कामाला वेग आणला आणि अवघ्या काही तासांच्या आत संशयित आरोपी असलेली नववधू सरिता हिला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार हे करत असल्याचे समजते.