सायबर भामट्यांनी आत्तापर्यंत अनेक नागरिकांना लक्ष केलेले आहे मात्र त्याहून पुढे जात आत्ता चक्क सायबर भामट्यांच्या जाळ्यात सर्वसामान्य नागरिकांसह सेलिब्रिटीज सोबतच न्यायाधीश देखील अडकल्याची घटना मुंबई येथे समोर आली आहे. न्यायाधीश यांच्या पगारावर हे आरोपी गेल्या वर्षभरापासून हात साफ करत होते. न्यायनिवाड्याच्या प्रकारात व्यस्त असलेल्या न्यायाधीश यांना तब्बल एक वर्षांनी ही बाब लक्षात आली त्यानंतर त्यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून सदर प्रकरणी तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार न्यायाधीश हे कुर्ला परिसरात राहात असून अतिरिक्त महानगर दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 3 फेब्रुवारी रोजी त्यांना त्यांच्या बँकेच्या पासबुकवर नोंद झालेले अनेक व्यवहार त्यांनी केलेच नाही हे लक्षात आले. विशेष म्हणजे हे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डचा वापर करून रक्कम काढण्यात आली होती. सदर प्रकरणी सायबर चोरट्यांनी त्यांचे एटीएम कार्ड क्लोन करून त्यांच्या खात्यातील रक्कम गायब केली असल्याचे समोर आले. सदर लुटीची ही बाब लक्षात येताच त्यांनी बँकेशी संपर्क केला आणि कार्ड बंद करण्यास सांगितले.
4 जानेवारी 2021 रोजी पहिल्यांदा त्यांच्या खात्यातून दहा हजार रुपये, आठ जून रोजी दोन हजार रुपये असे करत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तब्बल एक लाख 19 हजार रुपये न्यायाधीश यांच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी लंपास केले. कुर्ला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांनी या विषयावर बोलताना, ‘ या व्यवहारादरम्यान कुठे आणि कसे व्यवहार करण्यात आले याचा डाटा काढण्यात आलेला असून त्यानुसार तपास सुरू आहे’, असे सांगण्यात आले आहे.