पोलिसात तक्रार दाखल होताच लुटलेल्या पैशाचे ‘ रिफंड ‘ आले , महाराष्ट्रातील घटना

Spread the love

आर्थिक गुन्हेगारीची अनेक प्रकरणे सध्या राज्यात समोर येत असून अनेक प्रकरणांमध्ये आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना देखील तांत्रिक अडचण येत आहेत मात्र महाराष्ट्र पोलिसांचा धबधबा देशात कायम असून गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील काही आरोपी वठणीवर येतात असा एक प्रकार नांदेड येथे उघडकीस आला आहे.

नांदेड येथील वजिराबाद पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक उत्तम घोरपडे त्यांच्या बँक खात्यावर काही गुन्हेगारांनी डल्ला मारला होता मात्र सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे आरोपींना समजले आणि त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये पोलीस उपनिरीक्षक यांच्या अकाउंटवर डल्ला मारलेल्या पैशाचे रिफंड आले.

काय आहे प्रकरण ?

उत्तम घोरपडे यांचे चिरंजीव साई वरखडे यांनी सहा फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑनलाइन मागवलेले साहित्य अपूर्ण पद्धतीचे आले होते. त्यांनी ही बाब डिलिव्हरी बॉयला सांगितली आणि त्याने कस्टमर केअरचा नंबर दिला. त्यानंतर साई यांनी त्या नंबरवर फोन केल्यावर समोर ठकसेन असलेल्या व्यक्तीने गोड गोड बोलून उत्तम घोरपडे यांच्या कर्नाटक बँक खात्यातून शहाण्णव हजार रुपये काढून घेतले .

ठकसेन याचा मोबाईल नंबर घेत त्याच्या आधारावर वजीराबाद पोलिसात तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे लक्षात येताच सात फेब्रुवारी रोजी आरोपी असलेला ठकसेन याने पुन्हा शहाण्णव हजार रुपये घोरपडे यांच्या बँक खात्यात जमा केले. तात्काळ या पद्धतीने आरोपी वठणीवर आल्याने चक्क पोलीस उपनिरीक्षक यांच्यासोबतच हा प्रकार घडल्याने आरोपीने पैसे जमा केले असावेत अशी शहरात चर्चा असून सामान्य नागरिकांना देखील अशाच पद्धतीने पैसे परत मिळण्याची आशा लागून राहिलेली आहे.


Spread the love