बीडमध्ये दोन बहिणींनी अडवली धनंजय मुंढे यांची गाडी, काय आहे प्रकरण ?

Spread the love

बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांची गाडी अडवण्याचा प्रकार घडलेला असून वडवणी तालुक्यातील कुपा येथे राहणाऱ्या संभाजी वडजकर यांचा गंभीर मारहाण केल्याने त्यानंतर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला होता मात्र या गुन्ह्यात 302 कलम वाढविण्यात आलेले नाही म्हणून दोन मुलींनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी अडवली. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी त्यांना दोन वेळा आश्वासन दिले आहे मात्र तरीदेखील अद्याप काहीच कारवाई न झाल्याने या मुलींनी संताप व्यक्त केला आहे.

संभाजी वडजकर यांना गावातील भावकी आणि काही व्यक्तींनी 11 डिसेंबर 2021 रोजी अमानुषपणे मारहाण केली होती. या प्रकरणात संभाजी यांच्या मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 14 जानेवारी 2022 रोजी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी वडवणी पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही म्हणून संभाजी यांच्या तिन्ही मुलींनी चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला होता तसेच 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आंदोलन केले होते.

पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी त्यांना कारवाईचे आश्वासन दिले होते मात्र दोन महिने उलटले तरी या प्रकरणात 302 चा गुन्हा दाखल वाढविण्यात आलेला नाही आणि एकाही आरोपीला अद्यापपर्यंत अटक केली नाही म्हणून वडवणी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दोन्ही मुलींनी धनंजय मुंडे यांची गाडी अडवली आणि आपली कैफियत मांडली त्यावेळी मुंडे यांनी आपण माहिती घेऊन कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.


Spread the love