महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना मॅट्रिमोनियल वेबसाईटमधून ओळख झाल्यानंतर गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत असल्याचे समोर येत आहे. असाच एक प्रकार पुणे शहरात उघडकीस आला असून प्रकरण कोर्टात गेल्यानंतर सदर प्रकरणी आरोपीला जामीन देण्यात आला तर तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, असा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस व्ही निमसे यांनी हा निर्णय दिला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, निशांत रमेश चंद नंद्वाना उर्फ अधिकांश शिवप्रसाद अग्निहोत्री ( वय ३३ राहणार बालेवाडी मूळ राहणार बंगळुरु कर्नाटक ) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
एका 32 वर्षीय महिलेने त्याच्या विरोधात फिर्याद दिली असून 30 जून 2021 ते 16 डिसेंबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला असून मॅट्रिमोनियल वेबसाइटवरून ओळख झाल्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि वाकड परिसरात वेळोवेळी तिचा विनयभंग केला. आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिचे काही अश्लील व्हिडीओ काढून तिची 13 लाख रुपयांची देखील फसवणूक केली, असे पीडितेचे म्हणणे आहे.
आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे मात्र आरोपीने न्यायालयात जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याच्या अर्जाला सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी हरकत घेतली आणि सदर आरोपीच्या विरोधात पुण्यात चार, बंगळुरूमध्ये 3 आणि गुरुग्राम मध्ये 2 असे गुन्हे दाखल असून अशाच पद्धतीने आरोपीने अनेक महिलांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे असे सांगितले. सरकारी वकील यांचे म्हणणे मान्य करत त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे.